काही स्फुटक स्पंदने १) तुझ्या ओठींचा पाऊस थेंब थांब थेंब तो ओरंघळुदे मनी सच्छिद्र मना जप माणिक तो जा पावसात ये आता फिरुनी शोध नेमका अधरपंख जो २) झेलतो छातीवरी जो बोचरे प्रतिसाद सारे टापियले घाव ज्यांनी विसरुनी माणुसकी ३) ज्ञानप्रकाश पसरविण्या उघडावी कवडसे अज्ञानाच्या तिमिराने व्यापती नयने एक एक किरण नव्हे पाहिजे मशाली त्वरा करा उमगत नसे भले जाणतो कुणी वेग अंधाराचा ? की दवडला वेळ जितुका तितका वेग गुणे तयाचा ४) रिक्त रकाने भरण्या लिहीत नाही लिहीत नाही चांगलं सुचल्याविना गर्दीतूनी वाट कापे दिनक्रम माझा मज मानसी सुचण्या काही उसंत नाही ५) अव्यक्त प्रेमाचा भार सहन करता करता असलेली मैत्रीदेखील व्यक्त करायची राहून जाते नकळत ६) नाही तरंगले लोचनी पाणी संपताना श्रीमान योगी असो आस्तिक किंवा नाही नाही झुकले जर हे मस्तक मायमातीच्या या धरणी एक ही खूण जरी जाणवली नाही नाही बिघडले यांत काही किंतु ती या मातीची औलाद नाही ७) सांगू सखे कसे मनीचे कळेल का हे मम स्वप्न अपूर्ण स्तब्ध भासे मज चांदणे हे अशक्य वाटे तो चंद्र पूर्ण ८) जेवढं जास्त प्रेम तीच्यावर केलं होतं तेवढंच मला पुढील आयुष्यात तीला माफ करत जावं लागलं ९) हातात दिला जीव जिच्या तिने दिवाळीला स्वतःच्याच घरातल्या पणत्या पेटवल्या त्याने आणि मग लाथाडून फेकून दिला माझ्याच घरातल्या जळलेल्या फुलबाजांच्या कोनाड्यात हसल्या वर पणत्याही त्या कुत्सितपणे माझ्या विझवलेल्या स्वाभिमानाची राखोळी करण्याकरिता १०) समोरासमोरच्या त्या दोन खिडक्या अजूनही तशाच आहेत पण केविलवाण्या पाखरं उडून गेली आयुष्याच्या प्रवासाला एकमेकांना कधीही न भेटण्याकरिता ११) आपल्या माणसाने दगड मारल्यामुळे झालेल्या जखमेपेक्षा दगड उगारल्याची जखम जास्त तीव्र असते १२) माझ्या आठवणींचा साठा तू जपून ठेवला आहेस, आनंद आहे पण एक सांगू, त्या साठ्यापलीकडे ही माझी कथा आहे १३) हृदयात पालवी कुणीतरी रुजवावी रेशीम गाठींनी त्याला इतर कुणी फुलवावे त्या गुलदस्त्याच्या गंधाने दरवाळावे इतर कुणी १४) एका खांद्यावर विसावतो अन चार खांद्यांवर जातो रडत येतो अन अश्रू देऊन जातो रिकाम्या मनाने येतो अन आठवणींचे भांडे रिकामी करून दुसऱ्यांची मन भरून जातो एका आयुष्यात कितीतरी आयुष्य जगून जातो की जगवून जातो ? १५) डोळ्यांचे बरे आहे पावसात गेलो की लपविता येते मनाच्या रडण्याकरिता कोणता पाऊस वापरायचा ? १६) आयुष्यभर मनाच्या भांड्यात आठवणी साचणे त्यात रमून मनाचे ऊन पावसाचा खेळ खेळणे आणि कधीतरी एका झटक्यात डाव सोडणे अन भांडे रिते करून निघून जाणे १७) आयुष्याच्या धावपळीत नकळत सुटलेला रेशीम बंध कधीतरी सामोरा येतो अन मन तिऱ्हाईतासारखे भावनांच्या आवेगाला अश्रूंची वाट देऊन गुंतलेल्या धाग्यांची जाणीव करून देते पण तोपर्यंत आयुष्य फार पुढे निघून आलेलं असतं आता उरतात त्या केवळ जर ... तर रूपी कल्पना - शशांक.