आजी

आजी

थरथरणाऱ्या बोटांवरची
मलमलणारी कात
पाणावलेले डोळे आणि
आमच्याकाळाची बात

आजी तुला बसता बघता
बाल्य सारले गात
पुन्हा एकदा डोक्यावरून
फिरेल का ग हात ?


लंगडणाऱ्या पावलांना
चिमुकला हात
हातातली छडी कधी
लाडिक चापट जात

अभ्यासाला माझ्या कशी
तुझी अबोल साथ
पुन्हा का ग भरंवशील
तसाच खिमट भात ?


तिन्हीसांजा लक्ष तुझे
घड्याळाचे सात
तुपातली साजूक बोटे
रगडता वात

रात्रीच्या गुजगोष्टी
सर्व तुला ज्ञात
हसताना चमके तो
पडका मोदक दात


प्रत्येकाला असावी
एक आजी साथ
बालपणीचे संथ तळे
मौन राजहंस त्यात

आजी तुला बसता बघता
बाल्य सरले गात
पुन्हा एकदा डोक्यावरून
फिरेल का ग हात ?


... पुन्हा एकदा... डोक्यावरून...
फिरेल का ग हात ?

- शशांक.

Copyright © 2013-2025 , Shashank Shetye UK or all related affiliates including ShashankShetye.com, All Rights Reserved.

error: Content is protected !!